Sunday, February 7, 2010

रामू ( incomplete )

पहाटे डोळे चोळत गादीवर उठुन बसावे
हाक मारिता रामूला क्षणार्धात समोर यावे

हातात भांडे जलाचे दुसऱ्यात एक तसराळे
जागेवर चूळ भरावी अन् स्वच्छ करावे डोळे

जरा आळस देऊनी जांभया उगाच येती
वाफाळलेल्या चहाची कपबशी यावी हाती

कपडे गोळा करोनी गरम पाणी स्नानाला
चला साहेब आवराया नम्र विनंती कानाला

स्वच्छ करोनिया बूट हळुच पायात घालावे
दार उघडुनी गाडीचे आत बसाया सांगावे

Saturday, February 6, 2010

मित्र

This poem is based on the theme of the song एका तळ्यात होती

कोणी नसेल सुदैवी इतुके मित्र मिळती
पूर्वीपासुन अगदी साथ कुणाची नव्हती

अभ्यास शिकता त्यांच्या दृष्टीस मम प्रगती
गुणपत्रिकेत त्यांच्या मास्तर काही चुकती

गप्पा आठवत नाही बोलघेवडे पुष्कळ
प्रसन्न दर्शन माझे ओळख सुद्धा दुर्मिळ

परिक्षा जवळ येता शंका घेऊनि वेगे
आठवणीने दो कर पसरती देवामागे

शिकलो नव्हतो तेव्हा कला बडबडण्याची
उगीच कुठे जाउन सर्वांवर भापण्याची

मर्मात ठेवुनी बोट सर्वच हासती प्रेमे
फेकुनी फुले शब्दांची जंजाळ करती नेमे

लक्ष्य मजला करुनी प्रचंड स्तुतीचा पाठ
भारित नव ओळखी कधीच न घेती गाठ

सर्वच अती निःस्वार्थी मदत नाही कधीची
दिसले की ओरबाड सभ्य संस्कृती यांची

स्वप्नात बोलती सत्य गंडविणे व्यवसाय
कोणीच आपुले नाही सर्वत्र फायदा काय

उशीरा शिकलो जगी नियम अनिवार्य हे
विश्वास ठेवण्या पात्र मित्र मैत्रीणी नच हे

जीवाला जीव देणारे मित्रांची वल्गना भारी
रंगासम सरड्याच्या असती ते सहकारी !

प्रेम म्हणजे नक्की काय ?

बालपणी मनामध्ये फार कुतुहल
हासुनिया का रे सर्व टाळतात बोल
मोठेपणी उमगेल म्हणतात सारे
मिसरुड फुटले की वाहतात वारे

गुपचुप तुझे मुख हालचाली तुझ्या
बघताना मनामध्ये प्रसन्नता माझ्या
काळ्याभोर केसांमधे मोगऱ्याची फुले
वेणीवर गजऱ्याचा सुगंधही खुले

तुझ्या दर्शनाने मनी उमलते काही
दिसलीस नाही तर हुरहुर राही
बघताच तुला आत उसळते काही
तुषारही तहानेचे कारंज्यात काही

बोलताना तुझ्यासवे गोंधळून जातो
ठरवले किती जरी ततपप करतो
अभ्यासाच्या पुस्तकांची देवाण घेवाण
पानांपेक्षा महत्त्वाचे मुखपृष्ठ जाण

उत्सुकता मनामध्ये दांडगी अश्लील
चित्रफिती मिळवण्या गुप्त हालचाल
सौंदर्याचे आवरण उघडले थोडे
गलिच्छ ओंगळ कृती करण्याचे धडे

नाना शंका उभरती गोंधळ प्रचंड
सर्व मोठ्या माणसांची ही रे का आवड ?
बाहेरुन छान आणि आतमधे घाण
अशी कशी गुंफलेली मिलनाची वीण ?

तुझ्यासाठी मनामधे पवित्र हळवे
स्पर्शसुद्धा नाही कधी शरीराच्या नावे
मित्रांमधे बोलण्यास लज्जा वाटे फार
पालकांच्या आड येती जन्माचे संस्कार

वृत्तपत्र टीव्ही यांचा संमिश्र प्रसार
प्रबोधन दूर राही अव्यवस्था फार
गोंधळल्या मनामधे तिरस्कार अती
समाजात लोक ज्याला असभ्य म्हणती

वयाबरोबर झाल्या शंका साऱ्या लुप्त
वासनांचे शरीरात आक्रमण गुप्त
उलगडे जनतेच्या वागण्याचे सार
मनापेक्षा शरीराचा पूरक विचार

असा कसा वावरतो ढोंगी हा समाज
बाहेरुन सभ्य आणि आतुन निर्लज्ज
आवडती गोष्टी यांना लपुन कराया
चारचौघी बोलताना वाईट म्हणाया

कोणीतरी सांगा मला कसा घालु मेळ
कारंज्यात नाचताना तहानेचा घोळ
सहजच वापरला जातो शब्द जरी
क्वचितच प्रश्नावली एखादा विचारी

Saturday, January 30, 2010

बातम्या

गरम चहाचा कप हाती
तो घोट घोट घेताना
पेपर येई नजरेला
भल्या पहाटे उठताना

परत धाडले बिहारला
एका परप्रांतियाला
रंगवुनी त्याच्या हाती
संघटनेच्या फलकाला

आरक्षण द्या जातीला
मोर्चा निघे शहरामध्ये
आग चितेला द्या आधी
प्रगतीला स्वर्गामध्ये

कमिटीने दिली मान्यता
राज्याच्या विभाजनाला
घर ज्यांचे सीमेवरती
स्वतंत्र राज्ये करायला

मुस्लिम वधती हिंदुंना
हिंदू मारती मुस्लिमांना
धर्मयुद्ध हे अतिप्रिय
राजकारणी नेत्यांना

धान्याचे गगनी भाव
गिरणीत दळावे काय ?
सोन्याला दळण्यासाठी
रांगेत जनसामान्य

इतक्यात दिसे ते चित्र
मनमोहक नारीचे
काहीतरी छान पाहुन
बंद केले वाचायचे

Monday, January 25, 2010

छंद माझा आगळा

छंद माझा आगळा । मुलींचा मजला लळा ॥
गौरवर्णी रूपवान । ध्यास लागे रात्रंदिन ॥

मुखाचे अवलोकन । हळुच करावे लपुन ॥
काळेभोर डोळे खास । भोळा भाव निरागस ॥
दंतपंक्ती मनोहर । गोडवा ओघळे फार ॥
एकेक बोल मधुर । रसपान निरंतर ॥
रक्तवर्णी गाल छान । पाही हरपून भान ॥
जवळ असता ऐसी । कसे रोखावे मोहासी ॥

कॉफीला होता सोबत । हर घोटात अमृत ॥
खेळामध्ये तिची साथ । वास्तवात मनोरथ ॥
सिनेमाला बरोबर । नृत्य करी मनमोर ॥
हॉटेलात जेवण । आनंदाला उधाण ॥
उगीच मारता गप्पा । दिसतो मनाचा कप्पा ॥
जिथे नजरानजर । सर्व जगाचा विसर ॥

हासुन करी दान । पंचप्राणा संजीवन ॥
निखाऱ्यास फुंकोनिया । बेचिराख लीलया ॥

Friday, January 22, 2010

जखमा

This poem is based on my hypothesis.

जखमांनी भरले इतके
ते रक्त शरीरा झाके
जणु झेप घालुनी पक्षी
तोडती शवाचे लचके

भिजताना जगतो कारण
तो समोर दिसतो डोंगर
जो शिखरावरुनी अंधुक
पांघरतो उजेड निळसर

कष्टांनी भरलेला हा
चढण्याचा प्रयास करतो
होता पूर्ववत कांती
शंकेने घेरुन जातो

मग ध्यानी आले लवकर
जखमांची सोप्पी युक्ती
ना कधीच भरुनी येती
त्या गुप्त अचानक होती

Tuesday, January 19, 2010

कविता

कवितेची सुरुवात आश्चर्यजनक
ऑफिसात कामापेक्षा कंटाळा अधिक
मनातल्या भावनांना वाट दाखविली
हलकेच पानांवर शाई उतरली

भीत भीत चारोळीने केला मी प्रारंभ
सोपे अवघड शब्द जुळले सुलभ
एके दिनी अचानक लिहावेसे वाटे
दहा-बारा चारोळीने कविता प्रकटे

दाखविली प्रत्येकाला कविता पहिली
स्वत:चीच कथा जणु सर्वांनी पाहिली
नंतरच्या प्रयत्नांना टीका थोडीफार
पद्यापेक्षा गद्य वाटे अभिप्राय सार

शास्त्रामध्ये पाहिला मी कवितेचा अर्थ
नियमांनी बांधलेले शब्दजाल सार्थ
छंद मात्रा वृत्त यांना यमकाची जोड
नकळत साधतात परिणाम गोड

अक्षरांचे व्याकरण अर्थहीन ओळ
शब्दांचा कचरा करे विषयांचे बळ
आपोआप विचारात काव्याचे सृजन
मला पामराला नाही एवढा सन्मान

भावनांना छंदामध्ये गुंफुनिया हार
मंत्रमुग्ध रसिकांना देतो उपहार